तुम्हाला माहित आहे का ‘धोबी घाट’ नावाचे मेट्रो स्टेशन आहे? सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे ते भारतात नसून सिंगापूरमध्ये आहे. बसला ना हे ऐकून तुम्हालाही धक्का? असाच धक्का आम्हालाही बसला होता जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’ एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की, “कोणत्या शहरातील मेट्रो स्टेशनची नावे लिटल इंडिया, चायना टाईम, कैश्यू आणि धोबी घाट अशी आहेत?”
या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी प्रत्येकाला भारत किंवा चायनाच वाटले असेल पण जेव्हा त्या प्रश्नाचे पर्याय आले तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला कारण त्यात भारत आणि चायना हे पर्यायच नव्हते. त्या प्रश्नासाठी पर्याय होते – क्वालालंपूर, हॉंगकॉंग, सिंगापूर आणि बँकॉक. हे पर्याय बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
आपण कधी विचारच केला नव्हता की ‘धोबी घाट ‘ नावाचे मेट्रो स्टेशन अस्तित्वात असेल. या स्टेशनबद्दल कधी आपण ऐकलेही नव्हते. धोबी घाट म्हटलं की आपल्याला आठवतं भारतातील आणि मुंबईतील अश्या जागा जिथे धोबी समाजातील लोक एकत्र राहतात आणि मोठ्या प्रमाणावर कपडे धुतात.
आपल्यापैकी अनेकांना आमिर खानची २०१० मध्ये रिलीज झालेली ‘धोबी घाट’ ही फिल्मदेखील आठवली असेल. परंतु, टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये विचारलेल्या प्रश्नामुळे धोबी घाट एक वेगळ्याच चर्चेचा भाग ठरला आहे.
सोमवारी १३ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या केबीसीच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक प्रश्न विचारला होता – कोणत्या शहरातील मेट्रो स्टेशनची नावे लिटल इंडिया, चायना टाईम, कैश्यू आणि धोबी घाट अशी आहेत? आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय असे दिले होते – क्वालालंपूर, हॉंगकॉंग, सिंगापूर आणि बँकॉक. पर्यायांमध्ये भारत आणि चीन हे पर्याय नसल्यामुळे प्रश्न अधिकच रंजक ठरला. या प्रश्नाचे योग्य उत्तर सिंगापूर आहे हे कळल्यावर मात्र आपल्या सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
सिंगापूरमधील मेट्रो स्टेशनला धोबी घाट हे नाव पडण्यामागे एक खूप मोठी मनोरंजक गोष्ट आहे. १९ व्या शतकात इंग्रज जगभरातील अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये राज्य करत होते. १९१८ साली इंग्रज भारतीय सैन्यासोबत धोब्यांनादेखील त्यांच्यासोबत सिंगापूरमध्ये घेऊन गेले. धोब्यांकडून त्यांची कामे व्हावीत हाच यामागचा मुख्य हेतू होता. या धोब्यांमध्ये मुख्यत्वे उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडू येथील राहणारे लोक होते.
सिंगापूरमध्ये सुंगेई बेरास बाशा नावाची एक नदी होती. ज्याचा मलय भाषेत अर्थ ‘ओल्या तांदळाची नदी’ असा होतो. याच नदीच्या किनारी या धोब्यांचा अख्खा समूह राहत असे आणि किनाऱ्यावर कपडे धुण्याचे काम करत असे. भारतातून जेवढे लोक येथे आले ते तिथे स्थायिक होण्याच्या विचाराने आले नव्हते. खूप कमी धोबी त्यांच्या कुटुंबासोबत आले होते आणि तेसुद्धा तीन चार वर्षांत पुन्हा आपल्या घरी गेले. खरंतर भारतातून लोक इथे काम करण्यासाठी आले आणि ते येथील बाजारपेठेचा एक भाग बनले. त्यांच्या मेहनतीच्या बळावर त्यांनी त्यांचा इथे प्रभाव निर्माण केला.
सुमारे १०० वर्षे त्यांनी इथे काम केले. आज सिंगापूरमध्ये धोबीघाटाचे नामोनिशाण देखील नाही. पण सिंगापूर या लोकांना विसरले नाही. या परिस्थितीत सिंगापूरमध्ये मास रॅपिड ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमसाठी भूमिगत मेट्रो स्टेशन बांधले गेले तेव्हा त्याला ‘धोबी घाट’ असे नाव देण्यात आले. वर्षानुवर्षे देशासाठी योगदान देणाऱ्या एक प्रतिष्ठित व्यापारी समुदायाचे स्मरण व्हावे म्हणुन हे स्टेशन १९८७ मध्ये उघडण्यात आले.
काय मग आहे की नाही ‘धोबी घाट’ स्टेशनची कहाणी एकदम मनोरंजक? सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरलेले ‘धोबी घाट’ मेट्रो स्टेशन बघायला सिंगापूरला कधी जाताय मग?
0 Comments