एखाद्याने जॉब मगितल्यानंतर आपण नेहमी मस्करीत म्हणतो की मोनॅको बिस्किटच्या कंपनीत बिस्किटांना होल (छिद्र) करण्याचा जॉब आहे. करणार का? पण आपण कधी विचार केला आहे की मोनॅको, मारी, क्रॅकजॅक यांसारख्या बिस्किटांना छिद्र का असतात? ही बिस्किटे छिद्रांशिवाय का बनवत नाहीत? त्यामागे नेमके कारण काय? हे आणि असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांनाच नेहमी पडत असतात. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
मुंबईत चहावर प्रेम नसलेली व्यक्ती सापडणं म्हणजे कठीणच. इथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊनच होते. वाफाळत्या चहाचा घोट घेतल्याशिवाय कोणाचीच सकाळ होत नाही. चहासोबत ब्रेड बटर, चपाती, पाव आणि बिस्कीट असेल तर अहा! पोटच काय मनही भरून जातं. लहानपणापासून आपण चहासोबत वेगवेगळी बिस्किटे खात आलो आहोत.
सध्या आपल्याकडे वेगवेगळ्या ब्रँडची वेगवेगळी बिस्किटे उपलब्ध आहेत. पार्ले-जी, मारी, मोनॅको, क्रॅकजॅक, बौर्बोन अशी अनेक वेगवेगळ्या आकाराची व चवीची बिस्किटे आपण खात आहोत. प्रत्येकवेळी ही बिस्किटे खात असताना आपल्या डोक्यात एक प्रश्न येतो की, या बिस्किटांना छिद्र (होल) का असतात?
खूप लोकांना ही बिस्किटांवरची छिद्रे फक्त डिझाईन साठी केली आहेत असेच वाटते. परंतु, यामागे बिस्किटाची डिझाईन किंवा बिस्कीट आकर्षक दिसावे हे एकच कारण नसून एक खूप मोठे वैज्ञानिक कारण आहे. बिस्किटे बनवणाऱ्या कंपनीमध्ये बिस्किटे बनण्यासाठी चार कृती केल्या जातात. पहिली कृती म्हणजे मिक्सिंग, दुसरी फॉर्मिंग, तिसरी बेकिंग आणि चौथी थंड करणे.
मिक्सिंग प्रक्रियेत मैदा, साखर, मीठ आणि इतर आवश्यक घटक मिक्सिंग कंटेनरमध्ये पीठ बनवतात. यानंतर त्याला निरनिराळा आकार दिला जातो आणि याचवेळी त्यामध्ये छिद्रे केली जातात. त्यानंतर बिस्किटे बेकिंगसाठी मशीनमध्ये किंवा भट्टीत ठेवली जातात. बेक केल्यानंतर ती थंड करून पॅक केली जातात.
मुळात बिस्किटे चांगली बेक करता यावीत म्हणून ही छिद्रे बिस्किटांमध्ये केली जातात. या छोट्या छोट्या छिद्रांना ‘डॉकिंग होल्स’ असेही म्हणतात. ही छिद्रे बेकिंग प्रक्रियेदरम्यान वाफेला योग्य प्रकारे बाहेर जाण्यास मदत करतात. यामुळे बिस्किटे केक आणि छिद्र नसलेल्या बिस्किटांप्रमाणे फुगत नाहीत. त्यामुळे आपल्याला दिसून येते की छिद्र असलेली बिस्किटे ही फार जाड नसून सपाट असतात.
या छिद्रांमागील दुसरे कारण असेपण आहे की, बिस्किटे बनवण्यासाठी जे पीठ मळले जाते त्यात हवेचे बरेच फुगे निर्माण होतात आणि मग बेकिंग प्रक्रियेत हे फुगे फुगायला लागतात. त्यामुळे, बिस्किटांचा आकार मोठा होतो. पण, छिद्रे असणाऱ्या बिस्किटांमध्ये ही लहान छिद्रे त्यात येणारे बुडबुडे थांबवण्याचे काम करतात ज्यामुळे बिस्किटे सपाट आणि कुरकुरीत होतात.
बिस्किटे सपाट आणि कुरकुरीत होण्यासाठी फक्त छिद्रे असून चालत नाही तर ती छिद्रे समान अंतरावर आणि योग्य जागेवर असणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. अन्यथा, बिस्किटे खूप कडक किंवा खूप मऊ होऊन जातात. बिस्किटे छान सपाट आणि टेस्टी होण्यासाठी छिद्रे एकमेकांच्या जवळ केली जातात. जर ही छिद्रे केली गेली नाहीत तर बिस्किटांची चव चांगली लागत नाहीत. त्याचबरोबर बिस्किटांवरील छिद्रांची संख्या देखील महत्वाची आहे.
काय मग चहाप्रेमी, यापुढे चहासोबत बिस्कीट खाताना आपल्या मनात हा प्रश्न कधीच डोकावणार नाही आणि आपण मनसोक्त चहा-बिस्किटचा आस्वाद घेऊ.
0 Comments