निवडणूक म्हटलं की आपल्या डोक्यात अनेक पक्ष, त्यांचे उमेदवार, मतभेद, वादावादी यांसारख्या अनेक गोष्टी येतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुकीच्या पद्धती आणि कार्यकाळ असतात. आपल्याला निवडणूक म्हटलं की पहिल्यांदा आठवते ती लोकशाही पद्धत. या पद्धतीत लोकं लोकांच्या कल्याणासाठी लोकप्रतिनिधी निवडून देतात. परंतु, प्रत्येक ठिकाणी ही लोकशाही असेलच असे नाही. अशीच जगावेगळी निवडणूक चीनच्या जवळील तिबेटमध्ये होते. इथे कोणतेही मतदान किंवा वंश परंपरागत चालत आलेली सत्ता नाही आहे. चला तर मग जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या निवडणुकीबद्दल.
तिबेटसोबत ‘दलाई लामा’ हे नावच नेहमीच जोडले जाते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का दलाई लामा हे एखाद्या व्यक्तीचं नाव नसून ती तिबेटमधील सर्वात मोठे आध्यात्मिक गुरू आणि तिबेटी बौद्ध धर्माच्या प्रमुखाला देण्यात आलेली एक पदवी आहे.
होय, हे खरं आहे. ही पदवी आतापर्यंत १४ आध्यात्मिक गुरूंना मिळाली आहे. तिबेटचे चौदावे ‘दलाई लामा’ तेनजिन ग्यात्सो हे आहेत. विशेष महत्वाची बाब म्हणजे तिबेटमध्ये दलाई लामा निवडण्यासाठी कोणतेही मतदान केले जात नाही किंवा कोणतीही वंश परंपरा चालवली जात नाही.
तिबेटमध्ये अनेक वर्षांपासून चालत आलेल्या पुनर्जन्म प्रक्रियेचे पालन करून दलाई लामा ही पदवी दिली जाते. यामागे एक अतिशय रंजक कथा दडलेली आहे. या जुन्या प्रथेनुसार, सध्याचे दलाई लामा त्यांच्या मृत्यूपूर्वी भावी दलाई लामा किंवा त्यांच्या त्यांच्या अवताराशी संबंधित काही चिन्हे आणि लक्षणे मागे ठेवून जातात. त्यानंतर, या चिन्हांमार्फत ती लक्षणे किंवा चिन्हे असलेल्या नवजात बाळाचा शोध सुरू होतो. त्यालाच पुढे दलाई लामा बनवले जाते. हा शोध सध्याच्या दलाई लामा यांच्या मृत्यूनंतरच्या होतो.
भावी दलाई लामा शोधण्याची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची आहे, कारण याला काही महिने किंवा संपूर्ण वर्षाचा काळही लागतो. कधीकधी आधीच्या दलाई लामांनी नमूद केलेली लक्षणे एकापेक्षा जास्त मुलांमध्ये सुद्धा आढळतात. अशा परिस्थितीत काही परीक्षा घेऊन योग्य मुलाची निवड करतात.
या प्रक्रियेत दलाई लामांच्या वैयक्तिक वस्तूंची ओळख पटवणे खूप महत्त्वाचा घटक आहे. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर अशा मुलांच्या नावांची यादी केली जाते ज्यांची लक्षणे पूर्वीच्या दलाई लामांसोबत बऱ्याच प्रमाणात जुळत असतात. यापेक्षा आश्चर्यकारक बाब म्हणजे दलाई लामा यांच्या मृत्यूच्या ९ महिन्यांनंतर अशी लक्षणे असलेली मुले जन्माला आली तर त्यांचा देखील यात समावेश केला जातो. या प्रक्रियेत निवडलेल्या मुलाला ल्हासा येथे नेले जाते आणि तिथे त्याला बौद्ध धर्माची सूत्रे व इतर आध्यात्मिक ज्ञान देऊन दलाई लामा बनण्यासाठी तयार केले जाते.
सध्याच्या १४ व्या दलाई लामांचा शोध सुरू होण्यापूर्वी ज्यावेळी १३ व्या दलाई लामांचा मृत्यू झाला त्यावेळी १३ व्या दलाई लामांच्या मृतदेहाची दिशा दक्षिणेकडून पूर्वेकडे असल्याचे आढळून आली. या दिशेला लोकांना वेगळेच ढग दिसले आणि त्या दिशेला असलेल्या राजवाड्याच्या खांबावर ताऱ्यासारखी बुरशीही दिसली. यानंतर, दलाई लामांचा शोध घेणाऱ्या टीमच्या प्रमुखाने अनेक दिवस ध्यान आणि पूजा केल्यानंतर त्यांना जवळील पवित्र तलावात काही अक्षरांच्या आकृत्या, सोनेरी छत असलेला मठ आणि लाल रंगाचे छत असलेले घर दिसले होते.
सुमारे चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर, शोध पथकाला आमदो प्रांतातील एक शेतकऱ्याच्या मुलाचा शोध लागला ज्याने १३व्या दलाई लामांच्या साथीदारांना व त्यांची काठी, माळ आणि इतर अनेक गोष्टी अगदी सहजपणे ओळखल्या होत्या. आज हेच तिबेटचे १४ वे दलाई लामा म्हणून प्रसिद्ध आहेत.
काय मग दलाई लामांबद्दल इतक्या आश्चर्यकारक गोष्टी ऐकल्यानंतर तुमची तिबेटला भेट देण्याची उत्सुकता वाढली आहे ना! लवकरच तयारी करा आणि तिबेटसारख्या सुंदर जागेला भेट देऊन या.
0 Comments