आनंद चिंतामणी दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी ठाणे इथे झाला. लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणं दिघेंनी ऐकली. त्यामुळे बालमनातच राजकारण आणि समाजकारणाची बीज त्यांच्या मनात रुजले. बाळासाहेब ठाकरे त्यांचं दैवत झालं आणि उभं आयुष्य त्यांनी शिवसेनेसाठी काम करण्यासाठी समर्पित करण्याचे ठरविले. ७० च्या दशकात शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून दिघेंच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. ते थेट ठाण्याचे प्रति बाळासाहेब अशी ओळख त्यांनी निर्माण केली.
आनंद दिघेंच्या स्वरुपात शिवसेनेला ठाण्यासाठी एक भक्कम नेता मिळाला होता. कार्यकर्ता ते उपजिल्हा प्रमुख आणि नंतर जिल्हाप्रमुखाची धुरा आनंद दिघे यांनी सांभाळली. त्यांनी राजकारणात स्वतःला इतके वाहून घेतले की जिल्हाप्रमुख झाल्यानंतर त्यांनी आपलं राहतं घर सोडलं, आणि जिथे त्यांचं कार्यालय होतं तिथेच राहणं सुरू केलं. त्यांनी लग्नही केले नाही.
हळूहळू ठाण्यात त्यांचे प्रस्थ वाढू लागले. अडी अडचणी सोडवण्यासाठी लोकं त्यांच्याकडे धाव घेऊ लागले. लोकांची समस्या खरी का खोटी याची पारख करुन दिघे स्वतः जातीने त्या सोडवू लागले.
प्रसंगी शासकीय अधिकाऱ्याची कान उघडणी करण्यास ते पुढेमागे पाहात नसे. त्यांचा दबदबा वाढला. मग पुढे टेंभी नाका परिसरात त्यांनी आनंद आश्रमाची स्थापना केली. दररोज सकाळी तिथे जनता दरबार भरु लागला. सकाळी सहावाजल्यापासून दरबारासमोर समस्याग्रस्तांची रीघ लागू लागली. नंतर बघतो, करतो हे शब्दच दिघे यांच्या शब्दकोशात नव्हते. तक्रार खरी व योग्य वाटल्यास तात्काळ त्याच्या निवारणासाठी संबंधितांना फोन लावला जात असे. काम होत नसल्यास, गरज पडल्यास बळाचाही वापर ते करत. त्याचमुळे पोलीस असो वा प्रशासन, सगळ्यांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाला होता.
हिंदुत्त्वाविषयी ते कट्टर होते. आणि देवा धर्माबाबतही त्यांचे अतिशय कडक धोरण होते. त्यांनीच सर्वप्रथम टेंभी नाक्यावर सार्वजनिक नवरात्री आणि दहीहंडी उत्सवाला सुरुवात केली. धार्मिक कार्यात ते तप्तर असतं त्यातूनच त्यांची ‘धर्मवीर’ अशी ख्याती सर्वदूर पसरली. दिवसेंदिवस आनंद दिघे यांचे प्रस्थ वाढत होतं. मातोश्रीवर तर नाकापेक्षा मोती जड होतो की काय अशी कुजबूज सुरु झाली आहे अशी बाहेर चर्चा होऊ लागली. शिवसैनिक या प्रति बाळासाहेबांमुळे अस्वस्थ होऊ लागले.
“आनंदच्या पक्षनिष्ठेविषयी प्रश्न नाही. आनंदच्या हिंदुत्वनिष्ठेवरही शंका नाही, पण आनंद ज्या पध्दतीने कारभार करत आहे, त्याबद्दल प्रश्न आहे.” असं विधान बाळासाहेबांनी केलं आणि शिवसेनेच्या मनात दिघेंविषयी असलेली नाराजी उघड झाली. मात्र त्यावेळी “मी शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीनुसारच काम करतो” असं दिघेंनी स्पष्ट केले होते.
दिघेंनीही बाळासाहेबांप्रमाणे कोणतीही निवडणूक लढवली नव्हती, की कोणत्याही पदाची आभिलाषा त्यांनी बाळगली नव्हती. तरीही ते ‘ठाण्याचे बाळ ठाकरे’ झाले होते. फ्रंटलाईन या मासिकात त्यांचे हे नाव छापून आले होते.
१९८९ ला महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. या निवडणुकीत ठाण्यातून प्रकाश परांजपे हे महापौरपदासाठी शिवसेनेचे उमेदवार होते. आनंद दिघे यांच्यावर जिल्हाप्रमुखाची जबाबदारी असल्याकारणाने परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र मत फुटल्याने फक्त एका मताने परांजप्यांचा पराभव झाला. बाळासाहेब चिडले. ज्यांनी कोणी फंदफितुरी केली, त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांनीच पक्षाची प्रतारणा करुन विरोधक उमेदवाराला मत दिल्याची चर्चा सुरू झाली.
महिन्याभरातच खोपकरांचा दिवसाढवळ्या खून झाला. याप्रकरणात दिघेंना प्रमुख आरोपी म्हणून टाडा अंतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटकाही करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत ठाणे म्हणजे भाजपचा बालेकिल्ला अशी त्याकाळी ठाण्याची ओळख होती. मात्र आनंद दिघे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार म्हणून प्रकाश परांजपे यांना उभे केले. शिवसेनेला ठाण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयाला भाजपाच्या अनेक दिग्गजांनी प्रखर विरोध केला पण नंतर त्यांना दिघेंसमोर नमतच घ्यावं लागलं आणि ठाणे मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात आला. एका मताने महापौरपद हुकलेले प्रकाश परांजपे लोकसभेवर निवडून खासदार झाले. ते फक्त आनंद दिघेंच्या भक्कम पाठिंब्यामुळे. यामुळे तर आनंद दिघे यांचं ठाण्यातलं वलय अधिकच वाढलं आणि मुंबईत शिवसैनिकांच्या मनातली अस्वस्थताही!
२४ ऑगस्ट २००१ची पहाट होती. गणेशोत्सवानिमित्त दिघे कार्यकर्त्यांच्या घरी दर्शनासाठी भेटी देत होते, अशातच त्यांच्या गाडीचा अचानक अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला आणि पाय फ्रॅक्चर झाला.
अपघातानंतर त्यांना ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना पाहण्यासाठी जनसागर हॉस्पिटल बाहेर जमा झाला होता. सगळे त्यांना पाहू शकतील अशा वॉर्डमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली. मध्ये काचेची भिंत आणि पलीकडे त्यांचे चाहते. अधूनमधून भेटीला येणाऱ्या लोकांना ते हात वर करुन सुखरुप असल्याची खात्रीही देत होते. २६ ऑगस्टला त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्या संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावली. त्यांना एकापाठोपाठ दोन हार्ट अटॅक आले. अखेर १०.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मात्र आनंद दिघेंच्या मृत्युची बातमी जनतेला सांगण्यास कोणी धजावत नव्हतं. अखेर उध्दव ठाकरे यांनी, ‘’आनंद दिघे आपल्यातून गेले’’ असं जाहीर केलं. हे ऐकल्यानंतर हॉस्पिटल बाहेर जमलेल्या त्यांच्या १५०० चाहत्यांना दुःख आणि राग अनावर झाला. त्यांनी संपूर्ण हॉस्पिटलच पेटवून लावलं. दिघेंच्या मृत्यूनंतर तीन दिवस ठाणे बंद होतं. हजारो शिवसैनिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमा झाले. मात्र आपला नेता सोडून गेला यावर कोणालाच विश्वास ठेवावासा वाटत नव्हता.
हा अपघात नाही तर घात होता आणि त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठीच हॉस्पिटल जाळलं अशी चर्चाही होऊ लागली. पण पुरावा कधीच कोणाला सापडला नाही.
0 Comments