भारतीय चलनी नोटा भारत सरकार आणि भारतीय रिझर्व बॅंकेच्या आदेशानुसारच छापल्या जातात. भारतात चार ठिकाणीच नोटा छापण्याचे छापखाने आहेत. नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी येथे भारतीय चलनाची छपाई होते. नोटा छापण्यासाठी खास प्रकारची, स्वीस कंपनीने बनवलेली शाई वापरली जाते. वेगवेगळी चिन्हे, अंक आणि छायाचित्रे कागदावर छापली गेली की त्या कागदाच्या तुकड्याचे रुपांतर नोटेत होते. त्या नोटा खास सुरक्षा वैशिष्ट्यांनुसार छापल्या जातात हे विशेष, त्यामुळेच बनावट नोटा आणि खऱ्या नोटा यामधील अंतर आपल्याला कळून येतं.
भारतीय नोटांवर अशोक स्तंभ, महात्मा गांधी यांच्या फोटोसह अनेक प्रकारचे सिरिअल नंबर, आर.बी.आयची लिखित पट्टी असते हे तुम्हाला सुद्धा माहित असेलच. पण त्या सोबत या नोटांवर अनेक छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा असतात. अशीच एक गोष्ट १००, २००, ५०० आणि २००० च्या नोटांवर दिसते. त्या म्हणजे छापलेल्या तिरक्या रेषा! नीट निरखून पाहिलत तर तुम्हाला जाणवेल की नोटांच्या किंमती प्रमाणे या रेषांची संख्या कमी जास्त होते. या रेषांचे नेमके महत्त्व आणि छापण्यामागचा उद्देश काय? हे आपण जाणून घेऊया.
नोटांवर छापलेल्या या तिरक्या रेषांना ब्लीड मार्क्स (Bleed Marks) म्हणतात. या रेषा खास दृष्टीहीन लोकांसाठी छापतात. त्यामुळे त्यांना स्पर्षातूनच नोट किती रुपयांची आहे हे कळतं.
या रेषा फक्त १००, २००, ५०० आणि २००० च्या नोटेवर छापल्या जातात. प्रत्येक नोटेवर छापलेल्या रेषांची संख्या ही नोटेच्या किंमतीनुसार कमी अधीक असते. १०० च्या नोटेवर दोन्ही बाजुंना प्रत्येकी चार रेषा आहेत.
२०० च्या प्रत्येक नोटेच्या दोन्ही बाजुंना चार रेषा आणि दोन शुन्य, विशिष्ट प्रकारे छापले जातात. ५०० च्या नोटांवर दोन्ही बाजूस प्रत्येकी ५ रेषा आहेत. २००० च्या नोटेवर दोन्ही बाजूंला ७-७ रेषा छापल्या जातात. या नोटांना स्पर्श केल्यास त्या रेषा आपल्या हाताला जाणवतात. त्यामुळेच खास दृष्टीहिनांना नोटेची किंमत कळावी म्हणून या नोटांवर अशाप्रकारे तिरक्या रेषा छापल्या जातात.
सगळ्या नोटांच्या मागील बाजूस एखादे चित्र छापलेले असते. उदाहरणच द्यायचे झाल्यास, १०० च्या नोटेवर गुजरातच्या पाटन जिल्ह्यातील ऐतिहासिक राणीच्या बावडीचा फोटो आहे. ही विहीर म्हणजे भारतीय स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. सोळंकी वंशाची राणी उदयमती हिने तिचे पती भीमदेव यांच्या स्मृतीत ही बावडी बांधली होती.
मध्यप्रदेशातील विदेशा जिल्ह्यातलं, सांची स्तूप २०० च्या नोटेवर पहावयास मिळते. अशोक सम्राटाने निर्माण केलेले हे स्तूप म्हणजे भारतातल्या सगळ्यात पुरातन रचनेचा एक उत्तम नमुना आहे.
५०० च्या नोटेवर ऐतिहासिक लाल किल्ल्याचे छायाचित्र छापले आहे. याच लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी भाषण देतात!
२ हजारांची नोट तर आपल्या भारताचा झालेल्या वैज्ञानिक विकासाची ओळख करुन देणारी आहे. या नोटेवर इस्त्रोच्या मंगलयानाचा फोटो छापला आहे.
आपल्या रोजच्या वापरातील अशा या नोटा, ज्यांच्या बाबत अजून खूप रंजक माहिती तुम्हाला देत राहू, तूर्तास लेख नक्की शेअर करा.
0 Comments