काही कथा केवळ चित्रपटातच शोभतात. वास्तवात मात्र तशा घटना घडल्या की माणसाला चुटपुट लागून राहते. अशीच एक गोष्ट घडली परवीन बाबीच्या बाबतीत! परवीन बाबी, बॉलीवूडच्या मायावी दुनियेचा एक चमचमता तारा..! आपल्या सौंदर्याने लाखों हृदयांमध्ये आपले स्थान निर्माण करणारा एक लखलखता सितारा! पण परवीनच्या जीवनात घडलेल्या घटनांनी साऱ्या दुनियेला पार बुचकळ्यात टाकलं.
ती कधी जेएफके एअरपोर्टवर बेड्या घातलेल्या स्थितीत पोलिसांच्या गराड्यात दिसली.. सिक्युरिटी चेक करण्यासाठी नकार दिल्यामुळे अटक झालेली.. एखाद्या वेड्या माणसासारखी ती किंचाळत होती.. आणि तिला नेत होते.. मेंटल हॉस्पिटलमध्ये.. कधी ती महेश भट्टशी झालेल्या मतभेदांमुळे त्याच्यामागून धावताना दिसली तेही निर्वस्त्र…!
कुणी तिला स्क्रिजोफेनिया असल्याचे सांगितले.. तर कुणी व्यसनाधीन झाल्याने हे सगळे परिणाम होत असल्याचा दावा केला. काही तज्ञांनी तर ही अनुवंशिक विकृती असल्याचे नमूद केले. तिचे चाहते मात्र याचे सारे खापर तिच्या प्रियकरांवर फोडत होते. ते प्रियकर म्हणजे डॅनी डेन्जोङ्गपा, कबीर बेदी आणि महेश भट्ट!
पुढे भीती या एकाच भावनेने तिचे सारे जीवन व्यापून टाकले. तिचा कोणावरही विश्वास उरला नव्हता. अमेरिकेतील ६ वर्षांच्या वास्तव्यानंतर भारतात परतल्यावर ती एअरपोर्टवर प्लकार्ड घेऊन उभी होती. एकेकाळी लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला आपल्याला कोणी ओळखू शकणार नाही याची खात्री होती. सेक्रेटरी वेदप्रकाश शर्मा यांचेही डोळे तिला पाहून पाणावले होते. ती बदलली होती, अस्ताव्यस्त केस, बेडौल झालेले शरीर.. संपूर्ण बॉलीवूड विश्वावर बिकीनीची जादू घडवणारा तो सुडौल बांधा आता ओळखूच येत नव्हता.
भीतीने तिला इतके ग्रासले होते की, तिने आपल्या जवळच्या लोकांचीही भीती वाटू लागली होती. लोक भेटायला आले की त्यांचे बोलणे रेकॉर्ड करून ठेवत असे. तिचा आपले जवळचे मित्र, डॉक्टर इतकेच काय तर स्वतःच्या आईवरही विश्वास नव्हता. प्रत्येकाची ती पोलिसांत तक्रार नोंदवत असे. इच्छा असूनही कोणीही तिला मदत करू शकत नव्हते.
ती इतकी स्वत:च्या दुनितेत अडकली होती की तिला सतत भास होई की कोणी तिला मारायला येत आहे. तिने ज्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत एवढे सुपरहिट सिनेमा दिले त्यांच्यावर सुद्धा आरोप केला की, “अमिताभने मला मारायला माणसं पाठवली आहेत, तो माझा जीव घ्यायला बघतो आहे.” पण तिची स्थिती सगळ्यांना माहित असल्याने कोणी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. असाच आरोप तिने बिल क्लिंटनच्या विरोधात देखील केला होता.
अवघ्या ५६ व्या वर्षी परवीनने या जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूनंतर जवळपास २-३ दिवस तरी कोणालाही त्याबद्दल काहीही माहिती नव्हते. पण ३ दिवस दरवाज्यातून कोणीही ब्रेड, दूध नेले नाही तेव्हा पोलिसांत तक्रार दिली गेली. तिच्या मृत्यूनंतर अनेक लोक तिच्या मालमत्तेवर दावा सांगण्यासाठी आले पण त्यांपैकी कोणीही तिच्या अखेरच्या काळात तिच्या बरोबर नव्हते. तिच्या मृतदेहावर क्लेम करण्यासाठीही कोणी नव्हते. शेवटी तिचा प्रियकर महेश भट्टच पुढे आला.
परवीनच्या मृत्यूनंतर जवळपास ११ वर्षांनी तिच्या मालमत्तेच्या प्रकरणाचा कोर्टाने निकाल दिला, आणि तोही तिच्या आयुष्यासारखाच अनपेक्षित, अनाकलनीय!
२००५ मध्ये तिचा मृत्यू झाल्यापासून हा वाद अक्षरशः गाजत होता. एक सी-फेसिंग फोर बेडरूमचा बंगला, जुनागढच्या नवाबाने तिच्या वडिलांना भेट म्हणून दिलेली जुनागढमधील एक हवेली, दागिने आणि बँकेतील पैसा एवढ्या गोष्टी परवीनकडे होत्या. यातला ८०% वाटा जुनागढमधील परबीनच्या बाबी समुदायासाठी व त्यातीलच १०% हिस्सा तिच्या अहमदाबादमधील कॉलेजसाठी दिला गेला. आणि उर्वरित २०% मालमत्ता ही तिच्या मामाला देण्यात आली. बाकी कोणाला काहीही मिळाले नाही.
पैसा, प्रसिद्धी आणि सर्व सुखसोयी मिळाल्या तरीही कुठेतरी तिच्या जीवनात अपूर्णता राहिली.. सारे मिळूनही तिला त्याचा आनंद मात्र घेता आला नाही.. तिचं जीवन सतत अनिश्चिततेच्या गर्तेत हरवत राहिलं… अकल्पितपणे!
0 Comments