जेव्हा एखादे शुभ कार्य असते म्हणजे लग्न, वाढदिवस किंवा एखादा सण, तेव्हा आपण तो दिवस फटाके फोडून, गाणी गाऊन आणि नाचून साजरा करतो. इंडिया जेव्हा मॅच जिंकते तेव्हा तर आपण कहरच करतो. पण तुम्हाला माहित आहे का मित्रांनो तामिळनाडू मध्ये एखादी व्यक्ती मृत पावल्या नंतर फटाके फोडले जातात, वाद्य वाजवली जातात, गाणी गाऊन डान्स केला जातो. जे साउथ इंडियन चित्रपट बघतात त्यांना तर ही गोष्ट नक्कीच माहित असेल. नुकताच धनुषचा ‘कर्णन’ चित्रपट येऊन गेला त्यात तर अख्खा सीन चित्रित केला आहे. ही गोष्ट पहिल्यांदाच ऐकत असाल तर खालील लिंक वर क्लिक करून नक्की पहा.
तामिळनाडू हे आपल्या भारतातील दक्षिणेकडील राज्य! दक्षिण भारतात तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा अशी एकूण ५ राज्ये आहेत. आपल्या भारत देशात दोन संस्कृती समृद्ध झाल्या एक आर्य संस्कृती आणि दुसरी द्रविड संस्कृती. दक्षिण भारतातील हि पाच राज्ये त्याच द्रविड संस्कृतीला जोपासतात. काही इतिहासकार असेही सांगतात कि द्रविड लोक हेच भारताचे मूळनिवासी आहेत. पण ही गोष्ट वादातीत आहे.
असे नाहीये की तामिळ लोक आपल्या नातेवाईकांच्या जाण्याने आनंदी होतात आणि म्हणून त्यांचे मरण साजरे करतात. असे करण्यामागेचे कारण म्हणजे ती त्यांची पूर्वापार चालत आलेली एक प्रथा आहे.
तामिळ लोकांमध्ये आज सुद्धा द्रविड संस्कृतीतीळ काही प्रथा, रितीरिवाज पाळले जातात. त्यालीत हा एक रिवाज म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अनेक वर्षे जगून, आपल्या सर्व जबाबदाऱ्या योग्य पार पाडल्या नंतर अगदी म्हातारवयात मरण पावते तेव्हा त्या व्यक्तीचे मरण साजरे केले जाते. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती दिर्घ आजाराशी लढून मरण पावते तेव्हा सुद्धा त्या व्यक्तीचे मरण साजरे केले जाते. ह्यास ‘कल्याण सावू’ म्हणजे ‘लग्न मृत्यू’ असे म्हणतात. पण जेव्हा कोणी तरुण वयात मरण पावते तेव्हा कल्याण सावू केले जात नाही.
द्रविड संस्कृतीत असे मानले जाते कि जेव्हा माणूस खूप वर्षे जगून मरण पावतो किंवा दीर्घ आजाराने मरण पावतो तेव्हा तो ह्या मानवी जीवनाच्या त्रासातून, मोहातून आणि जोखडातून मुक्त होतो. म्हणूनच त्या व्यक्तीचे मरण साजरे केले जाते. स्त्रिया गाणी गाऊन त्या व्यक्तिच गुणगान करतात. त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचं कथन करतात. पराई आणि थप्पू नावाची वाद्ये यावेळी वाजवली जातात. लोक नाच करतात. फटाके फोडले जातात. ज्या दिवशी अंतिम संस्कार होतात त्या दिवशी मांसाहाराची मोठी मेजवानी केली जाते.
पूर्वापार काळापासून तामिळ लोक मृतास दफन करत असत. आजही तामिळनाडूत बऱ्याच ठिकाणी मृतास दफन केले जाते. असे सांगितले जाते की आर्य भारतात आल्यानंतर वैदिक काळात द्रविड लोक वैदिक रीतींचे पालन करू लागले. कुटुंबातील पहिल्या संततीस दहन करण्याची पध्दत तामिळ लोकात सुरु झाली. हि पद्धत काही काही तामिळ आणि मल्याळम लोक पाळतात.
आपल्या प्रिय लोकांच्या जाण्याने आपण दु:खी होतो. त्यांची उणीव आपल्या जीवनात भासते म्हणून आपण स्मारके बांधतो. आपण दगड-मातीची स्मारके उभारतो पण तामिळ लोक जिवंत स्मारके उभी करतात. ते आपल्या मृत नातेवाइकांस स्वतःच्या जमिनीत दफन करतात आणि त्यावर एक रोपटे लावतात. जणू काही त्या मृतांचा आत्मा त्या रोपट्यात जातो आणि त्या रोपट्याचे एक सुंदर झाड बनते.
0 Comments