चिखलदऱ्याच्या भीमकुंडाजवळ एक स्त्री एका झाडाखाली अत्यंत हताश चेहऱ्याने एकटक पाहत उभी होती. तिच्या मनात लाखो विचारांचं काहूर माजलं होतं आणि तिच्या डोळ्यातील ओलावलेल्या पापण्यांच्या कडा त्याची साक्ष देत होत्या. कोणत्या तरी एका विचारावर तिला ठाम व्हायचं होतं, पण मन साथ देत नव्हतं. मनाव्यतिरिक्त अजून एक गोष्ट तिने स्वत:शी कवटाळलेली होती, कदाचित त्यामुळे सुद्धा ती घेतलेला निर्णय सारखा बदलत होती. तिच्या पोटाशी तिने आपली पोर बांधली होती. मेख हीच होती कि निर्णय जरी तिचा एकटीच असला तरी तो लागू मात्र दोघींना होणार होता.
काय कराव तिला काहीच सुचेना. इतक्यात तिचं लक्ष ती ज्या झाडाखाली उभी होती तिथे गेलं. त्या झाडावर नुकतीच कोणीतरी कुऱ्हाड मारली होती आणि त्या खोडातून लालसर द्रव्य झिरपत होत. त्या स्त्रीला त्या झाडात स्वत:चंच आयुष्य दिसलं.
पण यावेळेला तिला त्या झाडाकडून काहीतरी ऐकू आलं. ते झाड तिला सांगत होतं, “बघ घाव तर माझ्यावर पण झाले आहेत पण तरी मी तुला सावली देतेय ना? आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात. आयुष्य हे घाव देत राहणार ते सहन करत ठामपणे उभी राहशील तर खरी आयुष्य जगशील.”
बस्स त्या स्त्रीच्या मनावर काय परिणाम झाला काय माहित? तिच्या चेहऱ्यावरील हताश हावभाव बदलले आणि एक करारीपणा दिसून आला. त्या करारीपणातून त्या स्त्रीला अशी काही नवसंजीवनी मिळाली कि पुढे त्या स्त्रीने आपल्यासारख्या कित्येक असहाय्य निराधारांना मदतीचा हात दिला आणि जगायला शिकवलं. हो मंडळी, ती स्त्री म्हणजे सिंधुताई सपकाळ होय.
ज्या चिखलदरा मध्ये त्या आत्महत्या करायला गेल्या होत्या, त्याच चिखलदरा मध्ये त्यांनी आपली पहिली संस्था उघडली हे विशेष! म्हणजे माणसाने मनात आणलं तर तो काय परिवर्तन घडवून आणू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण सिंधूताई होत्या. तेथील आदिवासींनी आपल्या घरातील माणसांप्रमाणे सिंधूताईना सांभाळलं आणि मग पुढे सिंधूताईंनी त्यांना सांभाळलं.
सिंधूताईंना आजही लोकं खूप मानतात याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांनी निराधारांना आसरा देण्याचा जो वसा घेतला तो कधीच सोडला नाही. त्यांच्या संस्था आज ज्या ठिकाणी आहेत तेथील जमिनी विकत घेण्यासाठी कित्येकांनी त्यांना कोटींच्या ऑफर्स दिल्या, पण त्यांनी पैश्यापुढे कधीच आपल्या लोकांना तोलले नाही आणि येणारी प्रत्येक ऑफर सुद्धा मायेने दूर केली.
उलट जे ऑफर द्यायचे त्यांना सुद्धा त्या म्हणायच्या कि माझ्या संस्थेसाठी काही करत असाल तर करा, या पैश्याची माझ्या पोरांना जास्त गरज आहे.
तर अशा या सिंधूताई सपकाळ नामक माउलीने कित्येक अनाथांच्या डोक्यावर मायेचा पदर धरला होता आणि हा मायेचा पदर ४ जानेवारी २०२१ रोजी कायमचा सुटला. जणू महाराष्ट्राच पोरका झाला. सिंधूताईंनी जे काही करून ठेवलं होतं आणि जे आयुष्य त्या जगल्या होत्या ते अतुल्य आहे. आपण फक्त त्यांचे विचार आत्मसात करून त्यांचे कार्य पुढे नेऊया हीच त्यांना खरी आदरांजली असेल!
0 Comments