आपला अभिमान, आपली शान आणि आपली बाण म्हणजे ‘भारतीय सशस्त्र दल’ अर्थात इंडियन मिलिटरी! या दला अंतर्गत तीन प्रमुख विभाग भारताचे रक्षण करतात. एक म्हणजे भारतीय सैन्य जे भूभागावरून शत्रू वर वचक ठेवते. दुसरे नौदल जे सागरी सीमांना सुरक्षित करते आणि तिसरे म्हणजे भारतीय वायुदल जे आकाशाला गवसणी घालत देशहितासाठी लढते. हे तिन्ही प्रकारचे सैन्य भारतासाठी अति महत्त्वाचे आहे. एखादे दल लहान किंवा दुसरे सर्वोत्कृष्ट अशी तुलना करता येत नाही. कारण प्रत्येक दलाचे एक खास वैशिष्ट्य आणि एक खास उद्दिष्ट आहे ज्यासाठी त्यांची स्थापना केलेली आहे.
तर या तिन्ही सैन्यदलांमध्ये एक फरक कोणत्याही परेड वेळी जाणवतो तो म्हणजे सॅल्युटचा होय. तिन्ही सैन्य दलांची सॅल्युट मरण्याची पद्धत वेगळी आहे आणि आज याचबद्दल खास माहिती ‘मवाली’ तुमच्यासाठी घेऊन आलंय!
सर्वात आधी आपण जाणून घेऊ आपले पायदळ अर्थात भारतीय सैन्याचा सॅल्युट! भारतीय सैन्याकडून दिला जाणारा सॅल्युट हा अन्य दलांच्या सॅल्युट पेक्षा वेगळा असतो. यात सैनिक वा उच्च पदस्थ अधिकारी आपल्या हाताचा तळवा समोर दिसेल असा ठेवतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताची सगळी बोटे एकमेकांना चिकटलेली हवीत आणि मधल्या बोटाने टोपी वा भुवईला स्पर्श करावा. या सॅल्युटचा अर्थ असा की, ‘माझ्या हातात कोणतंही शस्त्र नाही व मी तुला प्रामाणिकपणे मानवंदना देतो आहे.” यात ‘तुला’ म्हणजे आपली वा कोणत्याही दुसऱ्या देशाची भूमी वा झेंडा होय.
दुसरे दल म्हणजे अथांग सागरावर राज्य करणारी भारताची नौसेना होय. नौदलातले अधिकारी जेव्हा सॅल्युट करतात तेव्हा त्यांचा तळवा हा बंद असतो आणि जमिनीच्या दिशेने असतो. ही स्थिती ९० अंश कोनातली हवी असा नियम आहे. म्हणजे डोक्याला स्पर्श करणारा हाताचा तळवा हा जमिनीच्या दिशेने ९० अंश कोनात हवा. आता हाताची स्थिती अशी का?
तर जहाजावर काम करताना अनेकदा हात खराब होतात अशा खराब हातांनी आपल्या मातृभूमीला, झेंड्याला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना वंदन करणे अपमानजनक समजले जाते आणि म्हणून हाताचा तळवा न दाखवण्याची पद्धत नौसेनेमध्ये रुजू झाली.
शेवटचे आणि तिसरे दल म्हणजे वायुदल होय. भारताचे सर्वात प्रगत दल म्हणून जगभरात भारतीय वायुदलाचा लौकिक आहे. भारतीय वायुदलाच्या स्थापनेपासून ते २००६ पर्यंत भारतीय वायुदलातील सर्व अधिकारी भारतीय सैन्या प्रमाणेच सॅल्युट करायचे. पण २००६ मध्ये भारतीय वायुसेनेने सॅल्युट मध्ये बदल केला.
यात सॅल्युट करताना अधिकाऱ्यांचा तळवा हा काहीसा वर खुला असतो. ना तो भारतीय सैन्याप्रमाणे पूर्ण समोर असतो ना तो नौदलाच्या सॅल्युट प्रमाणे पूर्ण बंद असतो. तो तळवा मधल्या स्थितीमध्ये असतो.
तळव्याची ही स्थिती ४५ अंश कोनात असायला हवी असा वायुसेनेचा नियम सांगतो. अशा सॅल्युट मागचा अर्थ असा की हाताच्या तळव्याची स्थिती ही आकाशात झेपावणाऱ्या विमानाप्रमाणे दिसते. यातून भारतीय वायुसेनेच्या कार्याचे प्रतिक स्पष्ट होते.
कळली की नाही नवीन माहिती? चला तर इतरांना पण सांगा आणि अशा भन्नाट रंजक माहितीसाठी रोज ‘मवाली’ला भेट द्या!
0 Comments