काय? टायटल वाचूनच आश्चर्य वाटलं ना? अहो ‘मवाली’ ला सुद्धा जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा असंच आश्चर्य वाटलं. कारण हा जिल्हा आहे भारतातील मग भारतच स्वतंत्र नाही तर त्यातला जिल्हा स्वतंत्र झालाच कसा? मग या गोष्टीचा आम्ही शोध घेतला आणि जी माहिती मिळाली ती इतकी रंजक आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला माहित असायला हवी.
मंडळी हा जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या कित्येक धडाडीच्या राजकारण्यांची कर्मभूमी म्हणजे सोलापूर होय. चालुक्य, यादव, राष्ट्रकुट, बहामनी यांसारख्या विविध राजवटींची सत्ता लाभलेल्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास हा फार मोठा आहे. पण तुम्हाला माहित आहे का सोलापूर हे नाव कसं पडलं?
जुन्या मान्यतेनुसार सोळा पूर अर्थात सोळा गावे एकत्र आली आणि एक भलेमोठे गाव तयार झाले तेच गाव पुढे सोलापूर म्हणून प्रसिद्ध झाले. आता तुम्ही म्हणत असाल हे काहीतरीच लॉजिक आहे. आम्हालाही असेच वाटले. पण शोध घेतल्यावर ती १६ गावे कोणती ते देखील कळले आणि ही मान्यता बरोबर असू शकते असे वाटले. ती १६ गावे म्हणजे – अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी!
पण इतिहासातील पुरावे काहीतरी वेगळं सांगतात. मुघलांच्या राजवटी मध्ये या प्रदेशाला सोनलपूर म्हणायचे. हळूहळू कालांतराने त्यातील ‘न’ हा शब्द बाहेर पडला आणि सोलापूर नाव प्रचलित झाले. तर अशा एकापेक्षा एक रंजक इतिहासाने भरलेल्या ह्या सोलापूर जिल्ह्याची अजून एक रंजक गोष्ट म्हणजे हा जिल्हा भारत स्वतंत्र होण्याआधी ३ दिवस स्वतंत्र झाला होता.
९ ते ११ मे हे १९३० सालामधील ते ३ दिवस, ज्या दिवशी अख्खा भारत पारतंत्र्य उपभोगत असताना सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मात्र स्वातंत्र्य काय असतं त्याचा अनुभव घेत होते. पण हे कसं शक्य झालं, चला जाणून घेऊ.
जेव्हा १९३० साली महात्मा गांधींना इंग्रजांनी अटक केली तेव्हा संपूर्ण भारतात रोष उत्पन्न झाला. ज्या नेत्याने अहिंसेची शिकवण दिली त्याचेच अनुयायी रस्त्यावर उतरले. सगळीकडे जोरदार निदर्शने सुरु झाली. इंग्रजांनी सुद्धा असा रोष कधी पाहिला नव्हता. यामध्ये सोलापूर जिल्हा सुद्धा मागे नव्हता. महात्मा गांधींना अटक झाल्याचे कळताच सोलापूरकर सरळ सरळ जाऊन ब्रिटीशांना भिडले. पोलिसांनी बेछुट गोळीबार सुरु केला आणि यात अनेक जणांचा जीव गेला.
आता मात्र लोकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी जे हातात दिसेल ते घेऊन पोलिसांवर चाल केली. काहींनी थेट पोलीस स्टेशनलाच आग लावली. आता मात्र ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पोलिसांचे धाबे दणाणले. मुख्य अधिकाऱ्यासह सगळ्यांनी तिथून पळ काढला. सोलापूर जिल्ह्यात कायद्याचा एकही रक्षक दिसत नव्हता. जणू कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर होती. परकीयांना हुसकावून लावून स्वत:च राज्य असणे म्हणजे काय याचा अनुभव तेव्हा सोलापूर वासियांनी घेतला.
पुढे ३ दिवस त्या जिल्ह्यात यायची हिंमत ब्रिटीशांमध्ये आली नाही. या काळात इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे सोलापूर अध्यक्ष रामकृष्ण जाजू यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सर्व परिस्थिती हाताळली. तर अशा पद्धतीने तीन दिवस इथे भारतीय लोकशाही नांदत होती आणि लोक खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले होते.
सोलापूरच्या नावे असलेली अजून एक रंजक गोष्ट म्हणजे सोलापूर ही स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिली नगर पालिका आहे ज्यावर पहिल्यांदा १९३० साली भारताचा झेंडा फडकवण्यात आला होता. गांधींनी काढलेल्या दांडी यांत्रेपासून प्रेरणा घेत तत्कालीन जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी नगर पालिकेवर झेंडा फडकवला.
चिडलेल्या ब्रिटीशांनी तेव्हा सोलापूर मध्ये मार्शल लॉ लागू केला आणि कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. त्यापैकी मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसैन, जगन्नाथ शिंदे आणि किसन सरडा यांना दोन पोलिसांच्या हत्येखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आजही सोलापूर शहराच्या मध्यभागी ह्या हुतात्म्यांची स्मृती स्मारके असून ही जागा हुतात्मा चौक म्हणून ओळखली जाते.
तर असा हा सोलापूर जिल्हा आपलं असित्व आजही ठळकपणे दर्शवतोय रंजक इतिहासाचे वलय ओढून!
0 Comments