काही गोष्टी आपल्या इतक्या शुल्लक वाटतात की आपण त्याकडे सहज दुर्लक्ष करतो. पण त्या गोष्टी दुर्लक्ष कराव्या इतक्या पण शुल्लक अजिबात नसतात. असंच काहीसं आहे ह्या हॉटेल मधील साबणांचं. आपण हॉटेल मध्ये गेलो की तिथला सुगंधी आणि चांगल्या गुणवत्तेचा साबण नक्कीच आपल्याला भुरळ घालतो. मस्त पैकी बाहेरुन दमून, भागून, फिरून यावं आणि हॉटेलच्या उंची शॉवर रूम मध्ये आपापल्या आवडीप्रमाणे थंड वा गरम पाण्या खाली त्या सुगंधी साबणाच्या सुवासात मनसोक्त अंघोळ करावी यासारखे सुख नाही.
अंघोळ करून झाली, साबण आपण वापरला. अजून एक दोन दिवस हॉटेल मध्ये आपण स्टे केला आणि मग आपण तिथून निघालो. पण साबण तो तर तिथेच त्या ट्रे मध्ये ओला-सुका वस्थेत निपचित पडून आहे. काय होत असेल त्या साबणाचं? कधी विचार केला आहे? फार कमी लोकांनी हा विचार केला असेल. आणि ९९% जणांनी काय एवढं घेऊन बसलात म्हणून दुर्लक्ष केलं असेल. पण मंडळी जसं वर म्हटलं तस काही गोष्टी दुर्लक्ष कराव्या इतक्या शुल्लक नसतात. चला तर आज जाणून घेऊ काय होतं हॉटेल मध्ये वापरलेल्या साबणाचं?
जर हा प्रश्न कोणाला विचारला तर बरेच जण म्हणतील की वापरलेला साबण आहे ना? मग फेकून देत असतील. तर नाही मंडळी. हा साबण फेकून दिला जात नाही. तर तो पुन्हा वापरला जातो. थांबा, ई..ऊ… करू नका. पूर्ण जाणून घ्या आणि मग ठरवा ही खरंच किळस वाटण्यासारखी गोष्ट आहे का ते!
‘क्लीन द वर्ल्ड’ नावाची एक संस्था आहे आणि त्यांनी हा पुढाकार घेऊन प्रयोग सुरु केला आहे. त्यांच्या या प्रयोगाचे नाव आहे ‘ग्लोबल सोप प्रोजेक्ट’! ही संस्था करते काय, तर असे वापरले साबण मोठमोठ्या हॉटेल्स कडून आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या हॉटेल्स कडून घेते आणि मग त्यावर रिसायकलिंग करून त्यापासून पुन्हा नवीन साबण बनवले जातात. या मागचा उद्देश एकच आहे की साबणाचा अपव्यय आणि बरबादी होऊ नये.
आपल्या सभोवताली अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपण सहज पुनर्वापर करू शकतो आणि पर्यावरणाला आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करू शकतो. साबणाचं असंच काहीसं आहे. तो कचऱ्यात फेकून देऊन कचरा वाढवण्यापेक्षा त्याचा पुन्हा वापर करणेच योग्य गोष्ट आहे.
जेव्हा वापरलेले साबण या संस्थेकडे येतात तेव्हा पहिले काम असते त्यांचे निर्जंतुकीकरण करणे आणि मग त्यांची शुद्धता तपासणे. शेवटी जे जे साबण पुनर्वापरासाठी पात्र आहेत त्यांना पुन्हा नव्याने साबण होण्याचा मान मिळतो. केवळ साबणच नाही तर शॅम्पू, हेअर कंडीशनर यांच्यावर देखील असेच प्रयोग केले जातात.
आहे की नाही एक उपयोगी आणि भन्नाट आयडीयाची कल्पना!
0 Comments