संजय राऊत….हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं ओ? नेहमीच स्फोटक वक्तव्य करणारा नेता आणि एक कट्टर शिवसैनिक! ठाकरे परिवाराबाबत असलेले त्यांचे समर्पण आणि बाळासाहेब ठाकरेंविषयी असलेला आदर नेहमीच त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. पण तुम्हाला माहित आहे का? इतके प्रेम का? कारण ते आज ज्या ठिकाणी आहेत तिथवर त्यांना बाळासाहेब आणि ठाकरे परिवारानेच आणून ठेवले आहे. जर त्यांच्या आयुष्याला बाळासाहेब नावाच्या वटवृक्षाची सावली मिळाली नसती तर त्यांच्या राजकीय आयुष्याचे रोपटे कधीच इतके बहरले नसते! काय आहे संजय राऊत नामक या चेहऱ्यामागची कहाणी? एक पत्रकार कसा काय झाला महाराष्ट्राच्या पटलावरील एवढा मोठा राजकारणी? चला जाणून घेऊ.
संजय राऊत यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९६१ सालचा, लहानपणापासूनच असलेली हुशार आणि शोधक वृत्ती त्यांना त्यांच्या आवडीच्या पत्रकारीतेच्या क्षेत्रात घेऊन आली. त्यांच्या पत्रकारितेची भाषा ही अगदी विखारी आणि स्फोटक आणि हीच गोष्ट हेरली बाळासाहेब ठाकरे यांनी!
तेव्हा त्यांच्या शिवसेना पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ हे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले होते. राजकीय व्याप वाढल्याने बाळासाहेबांना वर्तमानपात्राच्या कामात लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसायचा आणि याचवेळेस त्यांच्या नजरेने २९ वर्षांचा हा तडफदार पत्रकार आणि त्याची जबरदस्त शब्दसंपदा हेरली व त्यांनी संजय राऊत यांना थेट सामनाचा कार्यकारी संपादक केले.
तेव्हा बाळासाहेबांना सुद्धा कदाचित माहित नव्हते की कधीकाळी हा मुलगा शिवसेनेच्या विद्यार्थी शाखेचा सदस्य होता. त्यांनी कॉलेज निवडणूक सुद्धा जिंकली होती. आपल्या कॉलेज जीवनात संजय राऊतांनी कॉलेजमधल्या राजकारणात खूप रस घेतला होता. पण ती मागे पडलेली आवड पुन्हा त्यांना खुणावू लागली.
मात्र पुन्हा एकदा आयुष्यात एक बदल आला. बाळासाहेबांच्याच सांगण्यावरून त्यांनी लोकसत्तामध्ये नोकरी स्वीकारली, पण तिकडे त्यांचे जास्त मन रमेना. कदाचित तेथील जास्तच मर्यादित अधिकार त्यांच्या सारख्या पत्रकाराला समाधान देऊ शकत नव्हते. मग तेथून त्यांनी दैनिक लोकप्रभा जॉईन केले. इथे त्यांना जे हवं ते करायला मिळालं.
पत्रकारीतेमध्येही क्राईम रिपोर्टिंग हा संजय राऊत यांचा आवडत भाग, अन्य स्टोऱ्या कव्हर करण्याचा जणू त्यांना कंटाळा, पण क्राईम म्हटलं की तिथे संजय राऊत हजर राहणार आणि अगदी खोलाशी जाऊन सत्य बाहेर काढणार अशी त्यांची ओळख निर्माण झाली.
तेव्हाचा काळ हा इतर डॉन्सचा होता. दाउद इब्राहीम अजून उदयास आला नव्हता. त्याचे नाव केवळ मुंबईपुरते होते. असं म्हणतात की दाऊद स्वत: येऊन संजय राऊत यांना आतल्या गोष्टी सांगायचा आणि मग दुसऱ्या दिवशी संजय राऊत महाराष्ट्राला हव्या असलेल्या अंडरवर्ल्ड मधील सनसनीखेज बातम्या पुरवायचे. तो एक असा काळ होता जेव्हा खास त्यांच्या बातम्यांसाठी लोक वर्तमानपत्र खरेदी करायचे.
संजय राऊत कधी कधी म्हणतात ना की माझ्या तरुणपणात मी मुंबईचं अख्खं अंडरवर्ल्ड आतून बाहेरून पाहिलं आहे ते यामुळेच, अगदी मोठमोठ्या गँगस्टरचा उदय आणि अस्त त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला हे खरंय!
या संपूर्ण काळात ते शिवसेनेपासून कुठेच दूर झाले नाहीत. त्यांची बाळासाहेबांशी अजूनही ओळख होती. काही काळाने त्यांनी राजकीय लेख लिहायला सुरुवात केले आणि त्यातही त्यांना प्रसिद्धी मिळाली. आपला चेला आता खऱ्या अर्थाने तयार झाल्याचे पाहून बाळासाहेबांनी पुन्हा त्यांना सामनाचे संपादक केले आणि संजय राऊतांच्या अग्रलेखाने सामनाला नवी उभारी मिळाली. असे म्हणतात की संजय राऊतच ते व्यक्ती आहेत ज्यांनी शिवसेनेचे हिंदुत्त्ववादी विचार सामनामधून प्रखरतेने मांडले. हे विचार केवळ मराठी माणसापुरते सीमित राहू नयेत म्हणून त्यांनी सामनाची हिंदी आवृत्ती देखील सुरु केली. राजकीय क्षेत्रातील त्यांचे वर्चस्व हळूहळू वाढत गेले.
राज ठाकरेंपेक्षा उद्धव ठाकरेंमध्ये जास्त पोटेन्शीयल आहे असे थेट म्हणणारा व्यक्ती म्हणजे संजय राऊत होय. ते उद्धव ठाकरेंच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. उद्धव ठाकरेंना राजकीय ओळख मिळवून देण्यात संजय राऊत यांचा महत्त्वाचा वाटा आहे. वर्ष २००४ उजाडेपर्यंत संजय राऊत हे नाव राष्ट्रीय राजकारणात देखील पोहचले होते. त्याच वर्षी त्यांना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवण्यात आले व तेव्हापासून आतापर्यंत ते सलग राज्यसभेचे खासदार आहेत.
संजय राऊत बोलण्याबाबत अतिशय जास्त स्पष्टवक्ते असल्याने त्याचा अनेकदा फटका शिवसेनेला बसतो. पण त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील होल्ड आणि त्यांना असलेला प्रदीर्घ अनुभव त्यांची जमेची बाजू आहे.
कोणत्याही संकटकाळात ते अशी काही सूत्र चाणक्याप्रमाणे हलवतात की गेलेली बाजी पुन्हा त्यांच्याच पदरात येऊन पडते. याचे जिवंत उदाहरण आपण २०१९ च्या विधानसभा निवडणुकी नंतर पाहिले आहेच!
0 Comments